नाशिक -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजोबांना घराबाहेर जाण्यास नातवाने वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत बाहेर जाण्यापासून रोखले. त्यामुळे आजोबांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. याचा राग धरून नातवाने आजोबांचा खून केला. त्यानंतर तोंडाला चिकटपट्टी लावत हातपाय बांधून मृतदेह एका नाल्यात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातू किरण निवृत्ती बेंडकुळे (वय 23) याला अटक केली आहे.
धोंडेगाव येथे राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे (वय 70) यांचा नातू किरण याने खून केला. आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती. आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने आरोपी किरण याने आजोबांच्या तोंडाला चिकटपट्टी लावत हातापायाला लोखंडी साखळी बांधून आडगाव शिवारातील नाल्यात फेकले.