नाशिकTruck drivers strike : वाहतूक क्षेत्रातील नवीन 'हिट अँड रन' कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संपाची हाक दिलीय. त्यामुळं नाशिक शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प झालाय. जवळपास 70 टक्के ट्रकचालक नियोजित संपाच्या आदल्या दिवशीच संपात उतरले. त्यामुळं शहरातील आडगाव येथील 'ट्रक टर्मिनल'वर शेकडो ट्रक रांगेत उभे आहेत. तसंच शहरात इंधन भरण्यासाठी सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. त्यामुळं आज मंगळवारी जवळपास 60 ते 70 टक्के पेट्रोलपंपावर इंधन संपल्याचे फलक दिसून येत आहेत.
पेट्रोलपंपावर पोलीस बंदोबस्त : मनमाड येथील पानेवाडी इंधन प्रकल्पावर इंधन भरणारे जवळपास 60 टक्के ट्रक पोहोचलेच नाहीत. त्यामुळं सोमवारी सायंकाळनंतर अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचं दिसून आलं. शहरातील त्रंबक नाका, मालेगाव स्टॅन्ड या ठिकाणचे पेट्रोल पंप बंद होते. तर, काही पेट्रोल पंपावर काल सायंकाळपासून लांबच लांब रांगा दिसून आल्या. आज मंगळवारी सकाळपासूनच 70 टक्के पेट्रोल पंपावर इंधन संपल्याचे फलक दिसून आले. तसंच अनेक पेट्रोलपंपावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
टँकरमध्ये तेल भरण्यास चालकांचा विरोध :पेट्रोलच्या दरात कपात होणार असल्याची चर्चा असल्यानं बहुतांश पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोलचा अधिकचा साठा ठेवला नव्हता. याशिवाय मनमाडमधून पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या 250 टँकर्समध्ये तेल भरण्यास चालकांनी विरोध केला. त्यामुळं नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणी पेट्रोल, डिझेल पोहोचू शकलं नाही, असं पेट्रोल डिझेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितलं.
नवीन कायद्याचा परिणाम :चार ते पाच वाहतूक संघटनानी आज संपाबाबत आपली भूमिका जाहीर करत संप मागे घेतल्याचं म्हटलंय. मात्र त्याच्या आदल्या दिवशीच जिल्ह्यातील 60 ते 70 टक्के ट्रक चालकांनी आपली वाहनं आडगाव येथील ट्रक टर्मिनलवर उभी केलीय. याबाबत मोटर मालक कामगार वाहतूक संघटनाचे अध्यक्ष सचिन जाधव यांनी म्हटलं की, हा नवीन वाहतूक कायद्याचा परिणाम आहे. त्यामुळे वाहनं जागीच उभी आहेत.
काय आहे 'हिट अँड रन' कायदा? :कलम 104 मध्ये 'हिट अँड रन' कायद्याचा उल्लेख करण्यात आलाय. नव्यानं तयार करण्यात आलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 104 मध्ये 'हिट अँड रन' कायद्याचा समावेश आहे. यानुसार, चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवल्यामुळं किंवा निष्काळजीपणामुळं एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालकाला कमाल 7 वर्षांच्या शिक्षेसह दंडाची तरतुद करण्यात आली आहे. याबात कलम 104 (ए) मध्ये उल्लेख आहे. तसंच, कलम 104B मध्ये अपघात झाल्यास चालक स्वतः किंवा वाहनासह पसार झाल्यास 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.
वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यास विरोध :'हिट अँड रन' कायद्यातील नवीन तरतुदींनुसार, अपघातानंतर पोलिसांना माहिती न देता फरार झालेल्या वाहनचालकास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच वाहनचालकांवर दंडही आकारण्यात येणार आहे. त्यामुळं देशभरातील चालक या कायद्याला विरोध करत आहेत. या नव्या कायद्याविरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये निदर्शनं होत असून महामार्ग रोखले जात आहेत. महाराष्ट्रातही या कायद्याला अनेक जिल्ह्यांतून विरोध होत आहे. तसंच या कायद्याविरोधात संप पुकारण्यात आला आहे.
हेही वाचा -
- पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळं पुण्यातील विविध पेट्रोल पंपांवर गर्दी; पाहा व्हिडिओ
- सरकारनं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये-राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन
- काय आहे हिट अँड रन कायदा? ट्रक चालक का झालेयत आक्रमक; वाचा सविस्तर