नाशिक (मनमाड):याबाबत सविस्तर वृत्त असे की, दानापुर-पुणे या रेल्वे गाडीतून मौलाना बिहारमधून जवळपास 60 मुलांना घेऊन सांगलीच्या मदरशात जात होते. येथे जाण्यासाठी त्यांनी सर्वांचे तिकीट आरक्षित केले होते. मात्र याच गाडीतून कोणीतरी खोडसाळपणा किंवा हेतुपुरस्सर ट्विट करून मुलांची तस्करी सुरू असल्याची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच भुसावळ डिव्हिजनमधून भुसावळ या रेल्वे स्थानकावर 29 मुलांना उतरवून घेण्यात आले. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता थेट मानव तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मौलानाना 12 दिवसांची कोठडी:या प्रकरणात आणखी काही मुले असल्याचे सांगून मनमाडला या मुलांना उतरवून घ्या व गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले. मौलानाना 12 दिवसांची कोठडी देण्यात आली तर मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात सोडण्यात आले. हा सर्व प्रकार समजताच बिहार येथील मुलांच्या पालकांनी मनमाडला व भुसावळला धाव घेउन आम्ही आमच्या स्वखुशीने आमच्या मुलांना मदरशात पाठवले असल्याचे सांगितले. ज्यांनी खोटी तक्रार केली त्याच्यावर व आरपीएफ व लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल करावा व आमच्या सारख्या गरिबांना का त्रास देतात याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. एकूणच काय तर आजही कायद्याचा दुरुपयोग करण्यात येत असुन विशिष्ट पद्धतीने देशातील वातावरण गढूळ करण्याचे काम सरकारी यंत्रणा मार्फत करण्यात येत आहे.