नाशिक - जिल्हा बँकेच्या कर्जवसुली मोहिमेला कंटाळून नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील 52 वर्षीय शेतकरी माधव टोपले यांनी गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, सक्तीची कर्जवसुली थांबवाण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा बँकेला दिले आहेत.
जिल्हा बँकेच्या कर्जवसुली मोहिमेला कंटाळून नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील 52 वर्षीय शेतकरी माधव टोपले यांनी गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी माधव टोपले सुरगाणा तालुक्यातील वांगण या ठिकाणचे रहिवासी असून त्यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके मधून 4 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कोरोना काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यानं त्यांना कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही. यातच जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पैसे भरण्याचा तगादा लावल्याने याच जाचाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मात्र या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा बँकेच्या अधिकार्यांना खडसावले असून सक्तीची कर्ज वसुली करू नये, असे आदेश दिले आहेत.
कोरोनामुळे शेतकरी हतबल सक्तीची कर्जवसुली नको - भुजबळ
दरम्यान, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी सुरगाणा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही. भाजी पाला देखील विकता आला नाही. अता कुठे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकतीच उभारी घेतली. त्यामुळे जिल्हा बँकेने त्यांच्याकडे तगादा लावू नये, असे आदेश आता पालकमंत्र्यांनी दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.