नाशिक- शहर आणि जिल्ह्यात काल (शनिवार) पासून पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सुमारे 37 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात सतत पाऊस चालू असल्यामुळे धरण समुहातून पाणी सोडण्यात आले आहे. गणपती स्थापने बरोबरच जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाल्यामुळे बळीराजा आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान नाशिक तालुक्यातील पिंपळगाव खाब येथे पुल ओलांडण्याचा नादात एक इसम वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे.
दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 104.78 मिलिमीटर पाऊस
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस हा रविवारी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात चांगली परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 104.78 मिलिमीटर तर शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस हा रविवारी सकाळपर्यंत सुरू असल्याने या कालावधीत सुमारे 37.5 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये इगतपुरी 422, पेठ 132, सुरगाणा 304, त्र्यंबकेश्वर 282, कळवण 154 ,सिन्नर 152, नाशिक 147, चांदवड 134, नांदगाव 141, येवला 131, मालेगाव 119, बागलाण 153 असा पाऊस नोंदविला गेला आहे.
इसम वाहून गेला
नाशिक तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना वसंत गांगुर्डे (वय 45) हा इसम पुल ओलांडण्याचा नादात वाहुन गेल्याचे समोर आले आहे. या इसमाचा शोध नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने घेतला जात आहे. या ठिकाणी उपनगर येथील पोलीस देखील दाखल झालेले आहेत.