नाशिक -विभागात गेल्या अकरा महिन्यामध्ये एसटी बसचे तब्बल २३१ अपघात झाले आहे. यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यादिवशी एसटी बस आणि रिक्षा विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला. त्यामुळे सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाचा प्रवास असुरक्षित बनला का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करण्याची भीती वाटत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
शहर आणि ग्रामीण भागामधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एसटी बस हा प्रमुख घटक आहे. महामंडळाने बस सेवेचा चेहरा बदलण्याचा नेहमी प्रयत्न केला. मात्र, एसटी महामंडळ नेहमी तोट्यात चालताना पाहायला मिळते. आता खासगी बसचे आव्हान पेलताना एसटी महामंडळाची दमछाक होताना दिसते.
प्रवाशांच्या सेवेत हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, एसटीचा प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला आहे. गेल्या अकरा महिन्यात नाशिक विभागात बसचे २३१ अपघात झाले. त्यामध्ये ४९ जणांना प्राण गमवावे लागले. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.
नाशिक एसटी-रिक्षा अपघात...वाचण्यासाठी इथं क्लिक करा...
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी बस रिक्षासह विहिरीत कोसळली होती. या अपघातात रिक्षातील प्रवाशांसह 26 जण मृत्युमुखी पडले. गेल्या वर्ष भराची आकडेवाडी पाहता नाशिक विभागात घडलेल्या बस अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्येच मोशीच्या अपघातातील 26 जणांची भर पडली. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. या आकडेवारीवरून एसटीच्या प्रवासावर नागरिकांना मधून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बस अपघाताची कारणे -
बसची देखभाल योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी कर्मचारीच अनेकदा करीत असतात. त्यात अनेकदा नियमांचे पालन काही चालकांकडून होत नसल्याच्या तक्रारी येतात. महामार्गावर इतर वाहनांपुढे वेगाने दामटवण्याच्या बस पहिल्या तर मनात धडकी भरते. इच्छित ठिकाणी वेळेत पोहोचवण्याच्या घाईत अपघातांना आयते निमंत्रण मिळते. अपघात झाल्यास पर्यायी अपघातग्रस्तांना किंवा मृतांच्या नातेवाईकांना लाखो रुपयांची भरपाई दिली जाते. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागल्याचे दिसते. महामंडळ अनेकदा सुरक्षितता अभियान राबवते. मात्र, ही मोहीम कागदा पुरतीच मर्यादित राहिली की काय? अशी शंका प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील बस आगारानिहाय अपघात -
जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या अपघातांबद्दल एसटी महामंडळाने दिलेली आकडेवारी -
- नाशिक 1 - 7 मृत 25 गंभीर
- नाशिक 2 - 3 मृत 17 गंभीर
- मालेगाव - 2 मृत 8 गंभीर
- लासलगाव - 1 मृत 4 गंभीर
- कळवण - 3 मृत 8 गंभीर
- पेठ - 0 मृत 7 गंभीर
- येवला - 0 मृत 5 गंभीर
- पिंपळगाव - 0 मृत 5 गंभीर
- नांदगाव - 3 मृत 13 गंभीर
- सिन्नर - 0 मृत 5 गंभीर
- इगतपुरी - 1 मृत 5 गंभीर
- मनमाड - 1 मृत 8 गंभीर
- सटाणा - 2 मृत 13 गंभीर
वरील सर्व अपघातामध्ये एकूण 23 मृत 133 गंभीर झाले आहेत, तर 84 किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच जानेवारी 2020 मध्ये मालेगाव येथील देवळा येथे झालेल्या बस अपघातात सर्वाधिक 26 जणांचा मृत्यू झाला आहे.