नाशिक - मागील एका महिन्यात ज्या गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला नाही, अशा ठिकाणच्या ३३५ शाळांची सोमवारपासून (19 जुलै) घंटा वाजणार आहे. दोन सत्रांमध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेल्या गावात एक जरी कोरोना रुग्ण आढळला तर तेथील शाळा बंद केल्या जाणार आहेत.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ 'चला मुलांनो, शाळेत चला' या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील ३३५ कोरोनामुक्त गावातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षण व आरोग्य विभागाने गावपातळीवर समन्वयाने नियोजन करून राज्य शासनाने सांगितलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
या गावात होणार शाळा सुरू
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थिती आढावा बैठक पार पडली. त्यात कोरोना रुग्ण नसलेल्या गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण मंत्रालयाने अनुकुलता दर्शवली असली तरी अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, असे सुचित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन मागील एका महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या ३३५ गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
४२ हजार पालकांची संमती
नाशिक जिल्ह्यातील 335 गावांतील शाळांमध्ये एक लाख ३१ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी ४२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिली आहे.
अशा आहेत सूचना
'शिक्षण व आरोग्य विभाग तसेच संबंधित ग्रामपंचायतींनी शाळा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांसाठी मास्क, वर्गात विद्यार्थ्यांमधील सुरक्षित अंतर, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण विभागाने शाळा सुरू होणार असलेल्या शाळांतील शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. तसेच राज्य शासनाच्या सुचनांप्रमाणे प्रत्येक सोमवारी कोरोनामुक्त गावांची यादी देखील प्रसिद्ध करावी. तसेच दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करून शाळा सुरू करण्यात याव्यात', अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत.
एका वर्गात फक्त १५ ते २० विद्यार्थी
'कोरोना प्रादुर्भावामध्ये शाळा सुरु करताना दिलेल्या अटि-शर्थींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी, दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर व एका वर्गात मोजून १५ ते २० विद्यार्थी बसवणे, या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच सकाळ व दुपार या दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्याची मुभा देण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यास परवानगी दिलेल्या गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळला तरी तेथील शाळा बंद कराव्या, असे शासनाचे आदेश आहेत. त्यांची अंमलबजावणी करावी', अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
'शहरातील शाळा सुरु करणे अशक्य'
'जिल्ह्यात 1 हजार २४ शाळा आहेत. कोरोनामुक्त गावातील ३३५ शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु करण्यासाठी मागील एका महिन्यात एकही कोरोना रुग्ण नको ही प्रमुख अट आहे. पण शहराचा विचार केला तर शाळा सुरु करणे अशक्य आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे व मोठ्या शहरातील शाळा सुरु करण्यासाठी नवे निकष अंमलात आणावेत', असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -पंधरा दिवसांत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षा घेणार - वर्षा गायकवाड