येवला (नाशिक)- पैठणीची नगरी म्हणून ओळख असलेला येवला तालुका कोरोनामुक्त झाला आहे. येवला शहर व ग्रामीण भाग मिळून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 33 वर जाऊन पोहोचली होती. सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे सर्व रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वजण कोरोनामुक्त होणे नागरिक व प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला मिळालेले फळ आहे.
टाळेबंदीत 24 एप्रिलला येवला तालुक्यात एक महिला कोरोनाबाधित आढळून आली होती. महिलेच्या संपर्कात आलेले तिचे कुटुंब व त्यानंतर आरोग्य विभागालाही कोरोनाचा विळखा बसला होता. येवला ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र, योग्य उपचारानंतर सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. येवला शहर व तालुका हा कोरोनामुक्त झाल्याने शहरवासियांसह ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.