महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Dengue Malaria Patients : चक्क एका दिवसात 32 हजार नागरिकांची डेंग्यू, मलेरियाची तपासणी; अहवाल संश्यास्पद - नाशिक डेंग्यू मलेरिया अहवाल संश्यास्पद

नाशिक शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, पालिकेने सादर केलेल्या एका अहवालावर संशय निर्माण झाला आहे. एका दिवसात जवळपास सात हजार घरांना भेटी देत, तब्बल 32 हजार नागरिकांची तपासणी केल्याचा अहवाल पालिकेने दिला आहे. त्यामुळे या अहवालाची चौकशी करण्याची मागणी 'आप'ने केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 22, 2023, 7:22 PM IST

Updated : Jul 22, 2023, 9:34 PM IST

प्रतिक्रिया देताना आपचे प्रवक्ते

नाशिक - पावसाळा सुरू झाल्याने नाशिक शहरात डेंग्यू, मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. मात्र, मलेरिया विभागाने एकाच दिवसात तब्बल 6 हजार 768 घरांना भेटी देत 32 हजार 155 जणांची डेंग्यू, मलेरियाची तपासणी केल्याचा अजब अहवाल सादर केला आहे. हा अहवाल फक्त कागदोपत्री असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

अहवाल कागदावरच - सध्या पावसाची रिमझिम सुरू झाल्यामुळे हळूहळू किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित धूर व औषध फवारणी होणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदार काम केल्याचे कागदोपत्रीच दाखवत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात सुरू असलेल्या कामाच्या अहवालावरच आता संशय येत आहे. पालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्रंबके यांनी 20 जुलै रोजी दैनंदिन अहवाल सादर केला. त्यात 32 हजार 155 नागरिकांचे सर्वेक्षण तर 6 हजार 768 घरांची तपासणी एका दिवसात केल्याचा दावा केला आहे.

अहवालच संशयास्पद -मुळात ही तपासणी करण्यासाठी मलेरिया विभागाकडे कर्मचारीच नाहीत. पेस्ट कंट्रोलसाठी जे कर्मचारी घरोघरी जातात त्यांच्याकडून ही तपासणी करून घेतली जाते. मात्र, गेल्या तीन वर्षापासून मुदतवाढीद्वारे जुन्याच ठेकेदाराकडून काम सुरू असून, त्यांनीही अलीकडेच संबंधित काम परवडत नसल्याचे कारण देत ठेका सोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे खरोखर 6 हजार 768 घरात तपासणी झाली का? तसेच भेटलेले 32 हजार 151 नागरिक कोण? त्यांच्या चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

सुपरवायझरकडून आकडे आले होते. त्यानुसार तपासणी संदर्भातील हा अहवाल तयार केला आहे. यात जर काही गफलत असेल तर त्याची खातरजमा करण्यासाठी फेरतपासणी केली जाईल - डॉ. राजेंद्र त्रंबके, जीवशास्त्रज्ञ, नाशिक पालिका

फॉगिंग नेमकी होते कुठे - नाशिक महानगरपालिका स्वतः ठेकेदाराला फवारणी व धुरळनीसाठी औषध देते. मात्र, ही औषधे नेमकी कुठे जातात? हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी औषधाच्या नावाखाली वाहनातील खराब काळे ऑइल फवारले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अचानक या औषधांची तपासणी करणे गरजेचे आहे. दुसरी बाब म्हणजे 1 हजार 397 घरात चक्क इंडोर फॉगिंग झाल्याचे दाखवले आहे.

कामचुकार हेच खरे देशद्रोही - नाशिक महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने एका दिवसात 32 हजार 151 लोकांची मलेरिया आणि डेंग्यू आजारांची तपासणी केली, असा अहवाल दिला आहे. यावर आम्ही आक्षेप घेत असून, ज्या लोकांची तपासणी झाली त्यांचे नावे आम्हाला समजले पाहिजेत. हा अहवाल फक्त कागदोपत्री असल्याचा आमचा आरोप आहे. कामचुकार सरकारी अधिकारी, कर्मचारी हेच खरे देशद्रोही असे आमचे म्हणणे आहे. एकूण नाशिक महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. CRPF Jawan Dies : डेंग्यूनेघेतला CRPF च्या जवानाचा बळी; मेजर काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  2. Dengue Patients Pune : पुण्यात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता; महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज
  3. Dengue Patient : डेंग्यू झाल्यास हे पदार्थ आहारात ठेवा, प्लेटलेट्स वेगाने वाढतील
Last Updated : Jul 22, 2023, 9:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details