नाशिक -सराफ व्यावसायिकाची बळजबरी लूट तसेच दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून घरात लुटमार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई इंदिरानगर पोलिसांनी केली. तर या दोन्ही गुन्ह्यांचा तत्काळ तपास केल्याबद्दल पोलीस उपायुक्तांच्या हस्ते पोलीस पथकाचा सत्कार करण्यात आला.
अपहरण करुन तलवारीचा धाक दाखवून लूट -
पंचवटीतील सराफ व्यावसायिक संजय बेरा 4 तारखेला दुचाकीवरुन जात असताना संशयितांनी त्यांचे अपहरण केले. तसेच तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने मिळून, एकूण चार लाखांचा मुद्देमाल लुटला होता. ही घटना ताजी असतानाच दोन दिवसांनी म्हणजे 6 तारखेला पांडवनगरी येथील नितीन आणि रंजना आहेर या दाम्पत्याला संशयिताने घरात घुसून चाकूचा धाक दाखवला आणि दोन हजार रुपये रोख, दोन मोबाईल असा एकूण आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हाेता.
या प्रकरणात पोलिसांनी मुबई नाका परिसरातील स्वराज्य नगर येथील संशयित अजय दहेकर याला अटक केली होती. त्यातून सराफ लुटमारीच्या गुन्ह्याची उकल झाली. त्यात अशोक कांबळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.