नाशिक - राज्य सरकारच्या निर्देशानुसार परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, चाचणी अहवाल नसल्यास प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अशा चाचणीतून ओझर विमानतळावर तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावर गेल्या पाच दिवसात 484 प्रवासी उतरले होते. त्यापैकी 373 प्रवाशांकडे कोरोना चाचणी केल्याचे अहवाल होते. तर 111 प्रवाशांकडे हे अहवाल नसल्याने त्यांची विमानतळावरच कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे तिन्ही प्रवासी मूळ नाशिकचे आहेत. त्यातील दोघे अहमदाबाद तर एक प्रवाशी दिल्लीहून नाशिकला परतला होता. या तिघांनाही तत्काळ महानगरपालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा-कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; यंत्रणेला सज्ज राहण्याच्या आमदार गणेश नाईक यांच्या सुचना
नाशिक रोड रेल्वे स्थानकात आढळले 21 प्रवाशी पॉझिटिव्ह-
नाशिक रोड रेल्वे स्थानकात रोज वेगवेगळ्या राज्यातून शेकडो प्रवाशी नाशिकला दाखल होतात. प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल अथवा कोरोनाचे लक्षण असल्यास रेल्वेस्थानकात महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकांकडून कोरोना अँटी रॅपिड चाचणी केली जाते. मागील पाच दिवसात नाशिक रोड रेल्वे स्थानकात परराज्यातून आलेले 21 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना महानगरपालिकेच्या बिटको हॉस्पिटलच्या कोविड कक्षात ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार गुजरात, गोवा, राजस्थान, दिल्ली या भागातून रेल्वे, रस्ता आणि विमानाने येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात दाखल होताना कोरोना चाचणी अहवाल बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा-लस - कोल्ड स्टोरेजसाठी पालिकेकडून जागेचा शोध, कांजूरची जागा निश्चित, तीन ठिकाणी ठेवणार लस