नाशिक -राज्यात पुन्हा दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिक पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नाशिक हद्दीतील अंबड आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 5 अधिकाऱ्यांसह 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीवरून नाशिक आयुक्ताय हद्दीतील अंबड आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 5 अधिकाऱ्यांसह 21 कर्मचारी कोरोनाची लागण झाली आहे. यातील काही जणांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. काही जण गृह विलगीकरणात आहेत.
हेही वाचा -नागपुरात संचारबंदीपूर्वी 2252 कोरोनाग्रस्तांची भर, आजपासून संचारबंदीला सुरूवात
आतापर्यंत 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
मागील वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून आला. नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोज 1 हजारहुन अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. दिनांक 15 मार्चच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 1356 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये 942 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहे. नागरिकांबरोबर कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या शेकडो पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यात 30 मार्च 2020 ते 31 डिसेंबर 2020मध्ये या कालावधीत नाशिक पोलीस आयुक्तालयातील 44 पोलीस अधिकारी आणि 394 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात दुर्दैवाने 7 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच मार्च 2021 या महिन्यात नाशिक शहरातील 5 अधिकारी आणि 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सरसावले; मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा
'बंद'ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद -
फेब्रुवारीपासून सातत्याने नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हा वाढू लागला आहे. त्यामुळे 8 मार्चपासून जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यातून जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना सूट दिली आहे. तसेच आठवड्यातील शनिवार आणि रविवार बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.