नाशिक- निवडणुकीच्या काळात ज्योतिषांचे भाकीत खरे ठरल्यास त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. आज (सोमवारी) नाशिकच्या हुतात्मा स्मारकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी २१ लाख रुपये बक्षीस ठेवल्याची माहिती दिली.
'ज्योतिष्यांनो निवडणुकीत खरे भविष्य सांगा अन् २१ लाख रुपये मिळवा' - अविनाश पाटील
निवडणुकीच्या काळात ज्योतिषांचे भाकीत खरे ठरल्यास त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, की निवडणुकीच्या काळात ज्योतिषांचा सुळसुळाट बघायला मिळतो. त्यामुळे ज्योतिष्यांनो तुम्ही भविष्य वर्तवा आणि लखोटा बंद आमच्याकडे पाठवा, मतमोजणीच्या वेळी तुमचे भविष्य खरे ठरल्यास २१ लाख रुपये बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून घेऊन जा, असे आव्हान यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले.
ज्योतिष हे शास्त्र आहे कला नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातले निर्णय ज्योतिषाने घेणे ही अंधश्रद्धा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात भारतामध्ये विविध ठिकाणी मोठे ज्योतिषी निवडणुकीचे भाकीत वर्तवत असतात. मात्र, ते आत्तापर्यंत खोटे ठरत आले आहेत.