नाशिक- पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी पक्षाने नाकारली, असे समजताच कृष्णानगर येथील सानप यांच्या निवासस्थानी भाजप नगरसेवक, समर्थक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पूर्व प्रभागचा विकास करून सुद्धा बाळासाहेब सानप यांना उमेदवारी का? नाही असा सवाल करत भाजपच्या 21 नगरसेवकांनी आपले राजीनामे शहराध्यक्षाकडे पाठवले आहेत.
मागील 8 दिवसांपासून बाळासाहेब सानप यांची उमेदवारी नाकारण्यात येईल, अशी चर्चा सुरू होती. तसेच बाळासाहेब सानप यांच्या विरोधात पक्षातल्या विरोधकांनी मोर्चेबांधणी करत बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी थेट पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती.
हेही वाचा - सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, आज दुपारच्या सुमारास मनसेतून भाजपवासी झालेल्या राहुल ढिकले यांना पक्षाने उमेदवारी दिल्याची चर्चा झाली. त्यानंतर सानप यांच्या घरी समर्थकांनी गर्दी करत आयाराम राहुल ढिकले यांच्या विरोधात बॅनरबाजी करत त्यांना उघड-उघड विरोध केला.
मागील 40 वर्षापासून एकनिष्ठ काम करणाऱ्या आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी दिली नाही, म्हणून पूर्व प्रभागातील भाजप 21 नगरसेवकांनी आपले सामूहिक राजीनामे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना पाठवले. प्रभागात कोट्यवधी रुपयांची काम करूनही भाजप सानप यांना उमेदवारी देत नसेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अन्यथा अपक्ष निवडणूक लढवावी, अशी इच्छा सानप समर्थकांनी व्यक्त केली.
हेही वाचा - नाशिकच्या तिन्ही आमदारांना उमेदवारी, मात्र भाजपच्या सानप याना ठेवले गॅसवर...