नाशिक- गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्टोबर महिन्यात तब्बल १७८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. आतापर्यंत ५४९ डेंग्यू संशयीत रूग्ण आढळले असून तीन संशयीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत शहरात १०५ तर ऑगस्ट महिन्यात १२० डेंग्यू संशयीत रुग्ण अढळून आले. हीच संख्या ऑक्टोबर महिन्यात ७०२ एवढी होती. १७८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार शहराच्या विविध सरकारी, खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पावसाळा लांबल्यामुळे पाणी साचून डासांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. महानगरपालिकेच्या वतीने डास निर्मुलनासाठी फवारणी आणि साफसफाई कायम सुरू असल्याचा दावा असला, तरी या कामात अनियमीतता होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.