नाशिक-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना काही सूचना केल्या होत्या. तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांनी यंदाचा गणेशोत्सव साध्यापद्धतीने साजरा करावा, अशी मंडळांना विनंती केली होती. याला नाशिकच्या ग्रामीण भागातील मंडळांनी प्रतिसाद देत नाशिकच्या तब्बल 174 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे.
नाशिक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा 30 हजार पार गेला आहे. यात सर्वाधिक नाशिकच्या निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, लासलगाव, सिन्नर, नांदगाव तसेच मालेगाव ग्रामीण भागात 7 हजार हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यात 212 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अशात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव सध्या पध्दतीने साजरा करावा अशा सूचना नाशिक ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या होत्या.