महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Camel Herd : नाशिकमधील 'त्या' 146 उंटांचे राजस्थानात होणार पुनर्वसन, तब्बल 10 लाख येणार खर्च - नाशिकमधील उंटांचे राजस्थानात पुनर्वसन

दहा दिवसांपूर्वी राजस्थानातून 154 उंट नाशिक जिल्ह्यात आले होते. अन्नपाण्याविना हे उंट शेकडो किलोमीटर पायी चालत आल्याने त्यांना अशक्तपणा येऊन त्यातील 8 उंटांचा मृत्यू झाला. आता उरलेल्या उंटांचे त्यांचे नैसर्गिक अधिवास असलेल्या राजस्थानात पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या उंटाना महाराष्ट्रातून राजस्थानात पोहोचवण्यासाठी सुमारे दहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

Nashik Camel Herd
Nashik Camel Herd

By

Published : May 16, 2023, 9:40 PM IST

Updated : May 16, 2023, 10:07 PM IST

पहा रिपोर्ट

नाशिक :राजस्थानचा राज्यप्राणी असलेल्या उंटांची संख्या दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने 2015 सालापासून उंट संवर्धन - संरक्षण कायदा अस्तित्वात आणला आहे. या कायद्यानुसार राजस्थान बाहेर उंटांना नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र गरीब भटके लोक चोरट्या वाटेने उंटांसह स्थलांतर करतात. असे करणे बेकायदेशीर असले तरीही गोरगरीब म्हणून त्यांना सामाजिक सहानुभूती मिळते. अशाच प्रकारे दहा दिवसांपूर्वी राजस्थानमधून तब्बल 154 उंट नाशिक जिल्ह्यात दाखल झाले होते. हे उंट हैदराबादला कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून जागृत प्राणी प्रेमींनी त्यांना अडवले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने उंट ताब्यात घेत ह्या उंटांच्या कळपाला नाशिकच्या पांजरपोळा संस्थेत आसरा म्हणून ठेवण्यात आले आहे.

सात जणांवर गुन्हा दाखल : अन्नपाण्याविना हे उंट शेकडो किलोमीटर पायी चालत आले होते. त्यामुळे त्यांना अशक्तपणा येऊन त्यातील 8 उंटांचा मृत्यू झाला. उंटांच्या या मृत्यूची थेट राज्यपालांनी दखल घेतल्यानंतर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमप यांनी चर्चा करून दिंडोरी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुटिया सय्यद, अस्लम सय्यद, शहाणूर सय्यद, सलीम सय्यद, इजाज सय्यद, दीपक सय्यद आणि शाहरुख सय्यद या सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र लहारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंटांच्या पायांना जखमा : 29 उंटांचा हा जथ्था वणी येथून दिंडोरी हद्दीतील कळवण रोडवर आला त्यावेळी पोलिसांनी या उंटांबाबत विचारणा केली. मात्र उंटांचे मालक त्यांच्याबद्दल पोलिसांना ठोस उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा पोलिसांनी दिंडोरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशूधन विकास अधिकारी डॉ. राहुल कोठाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या 29 उंटांची तपासणी केली. तपासणीत हे उंट तहानलेले व अशक्त असल्याचे तसेच त्यांना जास्त चालवल्याने त्यांच्या पायांना जखमा झाल्याचे समोर आले.

राज्यपालांकडून दखल : राजस्थान मधून उंटाची तस्करी होत असल्याची माहिती राजस्थानमधील एका सामाजिक संस्थेने महाराष्ट्राच्या राज्यपालांना कळवली. त्यानंतर राज्यपालांकडून त्याबाबतचे दक्षतेचे पत्र पशु कल्याण विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले गेले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली. या बैठकीनंतर घडामोडींना वेग आला. आता हे उंट नेमके कुठे आणि कशासाठी नेण्यात येत होते, याची कसून चौकशी होणार आहे.

उंटांचा रोजचा खर्च 40 हजार रुपये : मागील 11 दिवसांपासून 111 उंटांना नाशिकच्या चिंचोळे शिवारातील पांजरपोळा संस्थेच्या परिसरात निवाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी रोज या उंटांची खानपान आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या उंटांना रोज खाण्यात उसाची कुटी, मूरघात, गूळ शेंगदाणे, हरबरा आणि वाळले दिले जात आहे. या उंटांवर रोज जवळपास 40 ते 45 हजार रुपये खर्च येत असल्याचे नाशिक पंजारपोळा संस्थेचे व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांनी सांगितले.

उंट राजस्थानात परतणार : नाशिक जिल्ह्यात आलेल्या एकूण 146 उंटांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात पोहोचवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी राजस्थानच्या सिरोही मधील महावीर कॅमल सेंचुरी तसेच श्रीमद राजचंद्र मिशन या दोन संस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला आहे. रामचंद्र मिशनकडून उंटांच्या वाहतुकीकरीता मदत केली जाणार आहे. सेंचुरीमध्ये या उंटांचे पुनर्वसन होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उंटांच्या नाशिक ते राजस्थान प्रवासाचे पत्र तहसीलदार व पशुसंवर्धन उपायुक्त यांना दिले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

100 पेक्षा जास्त उंट राजस्थानपर्यंत घेऊन जाणे आव्हानात्मक आहे. या उंटांसोबत असणारे वीस रायका हे त्यांना देवासमान मानतात. ते त्यांच्यासोबत नाशिकमध्ये काही तास घालवणार आहेत. या सर्व रायकांना प्रत्येकी 25 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. सुमारे 45 दिवस तरी त्यांना प्रवास करावा लागू शकतो. यासाठी 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. - सुरेंद्र भंडार, सचिव, महावीर कॅमल सेंचुरी

तीन राज्यांचे पोलीस देणारे एस्कॉट : महावीर कॅमल सेंचुरीने महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या तिन्ही राज्यांच्या पोलीस प्रमुखांसोबत पत्रव्यवहार करून उंटांचा कळप सिरोहीपर्यंत सुरक्षितेकरित्या पोहोचवण्यासाठी पोलीस एस्कॉर्टची मागणी केली आहे. या तीनही राज्यांनी उंटांना पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी मान्य केली आहे. उंटांचा पायी प्रवास दीड महिन्यांचा असणार आहे. ते नाशिक - पेठ - धरमपूर - बार्डीली - कर्जन - बडोदा - अहमदाबाद - मेहताना - पालनपुर - अंबाजीमार्गे सिरोही जिल्ह्यातील कॅमल सेंचुरीपर्यंत प्रवास करणार आहेत.

हेही वाचा :

  1. Nashik Water Crisis : नाशिकमध्ये पाणी टंचाई; महिलांना खोल विहिरीत उतरून भरावं लागतंय पाणी
  2. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  3. Sri Siddhivinayak Nashik : उन्हाचा त्रास होवू नये म्हणून नाशिकमध्ये गणरायाला 'इतक्या' किलोंची चंदनाची उटी आणि मोगऱ्याची आरास
Last Updated : May 16, 2023, 10:07 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details