नाशिक- मालेगाव शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता या विषाणूचा तालुक्यातील ग्रामीण भागात देखील शिरकाव झाला आहे. आज रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून शहरातील रुग्णांची संख्या २९८ इतकी झाली आहे. या रुग्णांमध्ये मालेगावजवळील दाभाडी येथे एका ३३ वर्षीय रुग्णाला बाधा झाली असून मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कसमादे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
मालेगाव शहरात कोरोनाचा धुमाकूळ, एकट्या मालेगावात 298 रुग्ण.. - एकट्या मालेगावत येथे 298 कोरोना रुग्ण..
मालेगाव शहरात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा 14 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आज दिवसभरात 28 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकट्या मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या 298 जाऊन पोहोचली आहे, तर नाशिक जिल्ह्यातील रुग्ण संख्या 333 झाली आहे.
मालेगाव शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आता या विषाणूने तालुक्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला असून तालुक्यातील दाभाडी येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ३३ वर्षीय पुरुष रुग्णास बाधा झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची धास्ती वाढली आहे. सायंकाळी एकूण ५६ अहवाल प्राप्त झाले पैकी ४२ रुग्ण निगेटिव्ह असून १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ९ पुरुष, ४ महिला तर एका १८ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये अमरावती येथील राज्य राखीव दल तसेच दंगा नियंत्रण पथकाच्या प्रत्येकी एक जवानाचा समावेश आहे. तर पोलिस हेड क्वार्टरचे ४ तर मालेगाव कंट्रोल रूमचा एक कर्मचारी आहे.
शहरातील एकूण रुग्ण संख्या २९८ झाली असून यातील १२ रुग्ण मृत तर २० रुग्ण करोनामुक्त झाल्याने घरी परतले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 333 वर जाऊन पोहोचली आहे.