नाशिक - लॉकडाऊनमुळे विविध राज्यात नागरिक अडकले आहेत. त्यांना आपआपल्या राज्यात जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यानुसार मंगळवारी पंजाबच्या लव्हली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नाशकात आणण्यात आले. या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लॉकडाऊनमुळे पंजाबच्या लव्हली विद्यापीठात महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंजबावरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे १२० विद्यार्थ्यांना आणण्यात आले. त्यांची नॉलेज सिटीच्या वसतिगृहात रात्रभर राहण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी नाश्ता देऊन १० वाजण्याच्या सुमारास भुजबळ नॉलेज सिटीमधून सहा बसेसने राज्यातील विविध भागात सुखरूप पाठविण्यात आले. यावेळी बसेसमध्ये विद्यार्थ्यासाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच बसेस निर्जंतुकीकरण केल्या होत्या.