नाशिक- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी ११ हजार ४१७ लोकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
नागरिकांना शिवभोजनाचे वाटप करताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात १२२ शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून गरीब जनतेला १० रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवभोजन हे आमच्या शासनाची प्रमुख योजना असून तिची राज्यात काटेकोर आणि व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला सूचना देण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
राज्यात कुठे आणि किती आहेत केंद्र
अकोला २, अमरावती ३, बुलडाणा ३, वाशिम २, औरंगाबाद ४, हिंगोली १, जालना २, लातूर १, नांदेड ४, उस्मानाबाद ३, परभणी २, पालघर २, रायगड ४, रत्नागिरी ३, सिंधुदुर्ग ३, परळ ३, अंधेरी ३, वडाळा २, ठाणे ७, कांदिवली २, भंडारा २, चंद्रपूर ३, गडचिरोली १, गोंदिया २, नागपूर ७, वर्धा २, अहमदनगर ५, धुळे ४, जळगाव ७, नंदुरबार २, नाशिक ४, कोल्हापूर ४, पुणे १०, सांगली ३, सातारा ४, सोलापूर ५ अशी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालये, रेस्टॉरंटच्या माध्यमातून शिवभोजन योजना राबवली जात आहे. ज्या केंद्रांना योजनेची अंमलबजावणी करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्या केंद्रातून योजने अंतर्गत दुपारी १२ ते २ या वेळेत जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. लाभार्थींच्या १० रुपयांच्या रक्कमे व्यतिरिक्त उर्वरित रक्कम अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून अनुदान म्हणून केंद्र चालकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हेही वाचा-अंत पाहू नका..! अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, कांदा उत्पादकांचा इशारा