नाशिक -अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, मका, द्राक्ष, ऊस सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत जाहीर केली होती. त्याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 109 कोटींची मदत जमा करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
कोरोना संकटाबरोबरच शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले होते. जून-जुलै महिन्यात पाठ फिरवलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, जिल्ह्यातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शेतात पाणी साचल्याने अनेक पिके सडून गेली होती.
पावसामुळे मका, ऊस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान
नाशिक जिल्ह्यात पावसाच्या तडाख्यामुळे मका, ऊस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच, बागलाण तालुक्यात डाळिंब, तर निफाड, दिंडोरी या भागात द्राक्षांना मोठा फटका बसला होता. यात जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 917 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दहा हजार कोटीचे मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. मात्र, ही मदत वेळेत जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. पण, उशिरा का होईना, नाशिक जिल्ह्यासाठी सरकारकडून 110 कोटींची मदत प्राप्त झाली आहे.
युद्धपातळीवर शेतकऱ्यांना मदत
मागील एका आठवड्यात युद्धपातळीवर ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. पिकांसाठी हेक्टरी 10 हजार, तर फळबागांसाठी 25 हजाराची मदत देण्यात आली.
नाशिक तालुका निहाय मदत प्राप्त शेतकरी
देवळा - 5946
पेठ - 16606
त्र्यंबकेश्वर - 12596
बागलाण - 5230