नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नाशकात २० देशातून आलेल्या १०२ जणांचे शहरातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात विलगीकरण करत त्यांची कोरोनाबाबत चाचणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.
देशात परदेशातून येणाऱ्या नागरीकांमुळे भारतात कोरोनाचा फैलाव झाला आहे. ह्यामुळे केंद्र सरकारने कोरोना संसर्गबाधित देशातून भारतात येणाऱ्या ७ देशातील नागरिकांवर बंदी घातली आहे. ह्यात आता अमेरिका, दुबई आणि सौदी अरेबिया देशांची भर पडली असून हा आकडा १० वर पोहचला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची विमानतळावर वैद्यकीय तपासणी केली जात आहे.
२० देशातील १०२ नागरिक परदेशातून मुंबई बरोबरच इतर शहरातून नाशिकमध्ये परतले आहेत. ह्यात दुबईहून ४२, इटली १२, चीन ३, सौदी अरेबिया ६, जर्मनी ४, युके ५ तर इतर देशातील प्रत्येकी एक नागरिक नाशिकमध्ये परतले आहेत.