नंदुरबार- नंदुरबार जिल्हा परिषदेचा सत्तेचा तिढा अजूनही सुटला नसल्याने नेमकी कुणाची सत्ता स्थापन होईल याबाबत चर्चेला उधाण आले आहे. काँगेस- शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असली तरी आपआपले सदस्य सुरक्षित ठेवण्याची कसरत राजकीय पक्षांना करावी लागत आहे. दरम्यान, निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला समसमान जागा मिळाल्या असून देखील सत्ता स्थापनेचे सुत्र शिवसेनेच्या हाती असल्याने सत्ता युतीची की आघाडीची येईल, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नंदुरबार जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवड १७ जानेवारी रोजी होणार आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. ५६ पैकी काँग्रेस - भाजपने प्रत्येकी २३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी २९ विजयी उमेदवारांची आवश्यकता असून या सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक व महत्वाची ठरणार आहे. शिवसेना ज्या पक्षासोबत जाईल त्या पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे. मात्र, शिवसेना नेमकी कोणासोबत जाणार हे निकाल लागून चार दिवस उलटले तरी स्पष्ट नाही. युती किंवा आघाडी करायची याचा निर्णय मातोश्रीवरून होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना शिवसेना भवनात बोलावण्यात आले आहे. खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेनाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.