नंदुरबार- घराची झाडाझडती घेवुन नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील एका घरातून अडीच लाख रुपये किंमतीचे विविध घरगुती लाकुड साहित्य बनविणार्या साहित्यांसह साग, सिसम जातीचे लाकुड जप्त केल्याची कारवाई नंदुरबार, नवापूर व चिंचपाडा विभागाने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनविभागाच्या हद्दीत नवापाडा येथे एका घरात अवैधरित्या ताज्या तोडीच्या लाकडांपासून घरातील विविध साहित्य बनविण्यासाठी लाकुडसाठा असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. यावरुन पथकाने नवापाडा येथील घरात छापा टाकुन झाडाझडती घेतली असता अवैध ताज्या तोडीचे साग साईज, सिसम साईज, पायउतराईलसह सिसम लाकडापासून तयार केलेला सोफीसेट, तिपाही, रंधा मशीन, पायउतराई मशिन, असा एकुण 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
लाकुड व त्यापासून केलेले घरगुती साहित्य व मशीन जप्त करुन पथकाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केले आहे. याबाबत वनपाल कामोद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयिताविरुध्द भारतीय वनअधिनियम 1927, महाराष्ट्र वननियमावली 2014 व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.