नंदुरबार - अवैधरीत्या जमा करून ठेवलेला खैर जातीचा लाकूडसाठा नंदुरबार-नवापूर वनविभागाने जप्त केला आहे. हा लाकूडसाठा २ लाख ५० हजार रुपये किमतीचा असून तालुक्यातील जामतलाव येथून ताब्यात घेतला. तसेच, येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश सुरेश गावीत (रा. जामतलाव), अनिल बामण्या गावीत (रा. विसरवाडी) अशी या दोघांची नावे आहे आहेत. तर, या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.
नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील महसूल हद्दीतील खाजगी क्षेत्रात अवैध लाकूडसाठा असल्याची माहिती नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह जाऊन जामतलाव शिवारातील खाजगी क्षेत्रात छापा टाकला. यावेळी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा खैर प्रजातीचा संपूर्ण साल काढलेला लाकूडसाठा मिळून आला. यावेळी सदर लाकूडसाठा पथकाने जप्त करुन वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला. याबाबत जामतलाव क्षेत्राचे वनरक्षक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परेश गावीत आणि अनिल गावीत या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.