नंदुरबार- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतीगृह तसेच कोचिंग क्लासेसही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, अप्पर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सातपुते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हेही वाचा -म्हसावदच्या जि. प. प्राथमिक शाळेची दुरवस्था; जीर्ण इमारत धोक्याची
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले की, जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 8 रूग्णांना आयसोलेशनसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 2 रूग्णांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून इतर 6 रूग्णांना निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी नगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालय यांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आता जिल्ह्याभरातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले असून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा, इतर खासगी शाळा, खाजगी क्लासेस, आश्रमशाळा, वसतीगृह 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत.
दरम्यान, आगामी 2 आठवड्यापर्यंत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी केले आहे. आगामी काळात मंगल कार्यालयांची बुकींगही रद्द करण्याच्या सूचना देण्यात येणार असून यजमानांनी मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत लग्न लावून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -नंदुरबार : शिवजयंती मिरवणुकीत डीजे वाजवल्याप्रकरणी सहा मंडळांवर गुन्हे दाखल