नंदुरबार - राज्यासह जिल्ह्यात 15 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला प्रशासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आदेशित करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करीत नंदुरबार शहर व तालुक्यात विनापरवानगी लग्न सोहळा आयोजन करून 25 पेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्या प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी वधू वरासह आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात मास्क लावणे व लग्न सोहळ्यासाठी स्थानिक पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असताना नंदुरबार शहरात एका ठिकाणी विनापरवानगी लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच नंदुरबारचे नायब तहसीलदार व शहर पोलीस यांच्या पथकाने विवाहस्थळी भेट दिली. याठिकाणी 50 ते 60 वर्हाडीची गर्दी उपस्थित राहिल्याने तेही विनामास्क आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी नवरदेव, नवरीसह पाच जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबारचे शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, गोपनीय शाखेचे पो.ना.नरेंद्र देवराज, पोकॉ.शैलेंद्र माळी, पोकॉ.श्रीकांत पाटील यांच्या पथकाने केली.