नंदुरबार - राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकर आणि रेल्वेची मदत घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आता नंदुरबारमध्ये गाढवाची मदत घेत पाणी पुरवठ्याची आगळी वेगळी योजना प्रशासनाने तयार केली आहे.
दुष्काळाच्या झळा; नंदुरबारमध्ये गाढवावरुन होतो नागरिकांना पाणीपुरवठा - पाणी पुरवठा
नंदुरबारमध्ये प्रशासन गाढवाची मदत घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा करत आहे.
जिल्ह्यातल्या कुवलीडाबर गावातील भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. मात्र, अतिदुर्गंम अशा डोंगर दऱ्यात वसलेल्या या गावाला जाण्यास रस्ताच नसल्याने गावकरी आणि प्रशासनाने अखेर पाणी पुरवठ्यासाठी एक आगळी वेगळी योजना सुरू केली. या गावात गाढवाच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी गावातील तब्बल पंधरा गाढवांच्या माध्यमातून पायथ्याशी असलेल्या रापापूर गावातून गाढवांवर पाणी लादून कुवली डाबर ग्रामस्थांना पाणी पोहचवले जात आहे. गावातील पंधरा गाढवे रोज प्रत्येक खेपेला प्रत्येकी ३० लीटर पाणी वाहून घेवून जातात. दिवसातून २ खेपांच्या माध्यमातून डोंगरदऱ्यांत वसलेल्या कुवली डाबर गावाला जेमतेम ९०० लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी प्रत्येक खेपेमागे गाढवाला ७५ रुपये इतका रोज शासनाकडून अदा केला जात आहे. त्यामुळेच पाणी टंचाई निवारणासाठी गाढवाद्वारे पाणी पुरवठा होणार कुवली डाबर हे राज्यातील पहिलेच गाव ठरले आहे.
पाण्याची ने-आण ज्या रस्त्यावरुन होत आहे तो रस्ता अतिशय खडतर आहे. त्यामुळे या ठिकाणी ही गाढवे अनेक वेळा पडताना दिसत आहे. साडे तीनशे लोकसंख्या असलेल्या या गावात ३ लीटर प्रती दिन प्रती व्यक्ती इतकच पाणी उपलब्ध होत आहे. तर दुसरीकडे त्यांची जनावरे ताटली भर पाणी पिवून गुजारा करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जनावरांसाठी चारा छावणी आणि या गावाला रस्ता दिल्यास, अशा संकटांना वारंवार सामारे जावे लागणार नाही, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.