नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. (Nandurbar Grampanchayat Election). यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आज 117 ग्रामपंचायतीसाठी 412 मतदान केंद्रावर मतदान पार पडते आहे. (Voting for 123 Grampanchayat in Nandurbar). यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी 394 तर सदस्य पदासाठी 2 हजार 454 उमेदवारांसाठी 1 लाख 83 हजार 386 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून आज प्रत्येक तालुक्यातील तहसिल कार्यालयामधून मतदार कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.
मतदान यंत्रात बिघाड : नंदुरबार तालुक्यातील धानोराच्या 04 नंबर बुथ मधील मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत खोळंबा आला आहे. मशीनच्या केबल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मशीन बंद पडले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात नवीन मशीन घेऊन मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 412 मतदान केंद्रे आहेत. यात चार मतदान अधिकारी, कर्मचारी तर दोन पोलीस कर्मचारी अश्या 6 जणांचा समावेश आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्यात पोलीस दलातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुका : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा, खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डनेल, मनीबेली, मोलगी, भगदरी, भाबलपुर, घंटाणी, विरपुर, सोरापाडा, अलीविहिर, बिजरीगव्हाण, खटकुणा, टावली, मंडारा, खाई, कौलीमाळ, कंकाळमाळ, कुवा, बेडाकुंड, बोखाडी, वडीबार, ओहवा, वेली, उमरगव्हाण, चिवलउतार, माळ या 30 ग्रामपंचायतींसाठी 119 मतदान केंद्रे असून यात 29 हजार 256 महिला मतदार व 29 हजार 896 पुरूष मतदार आहेत. इतर 1 मतदार मिळून एकूण 59 हजार 153 मतदार आहेत. या ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी 107 तर सदस्य पदासाठी 724 उमेदवार रिंगणात आहेत.
अक्राणी तालुका : अक्राणी तालुक्यातील मांडवी बु. मक्तारझिरा,मांडवी खु, वावी, जुगणी, भमाणे, भाबर, उडद्या, राजबर्डी, कुवरखेत, कात्रा, तेलखेडी, कुकलट, शेलकुई, वलवाल, केलापाणी, खडकी,फलाई, भादल, कुंडया, रोषमाळ खुर्द, कुंभरी, थुवाणी, डुडल, कुकतार, डोमखेडी, गेंदा, माळ, खुटवाडा, पिपंपळबारी, चांदसैली, बिजरी, गोया, कामोद खु., चिखली, बिलगांव, त्रिशुल या 44 ग्रामपंचायतीसाठी 139 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून यात 25 हजार 128 महिला व 25 हजार 910 पुरुष असे एकूण 51 हजार 38 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या 44 ग्रामपंचायतीतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी 146 तर सदस्य पदासाठी 854 सदस्य रिंगणात उभे आहेत.