नंदुरबार - महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान आज २९ एप्रिलला पार पडत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आज भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित, काँग्रेसचे के.सी. पाडवी आणि अपक्ष उमेदवार डॉ. सुहास नटावदकर यांच्यात लढत आहेत. एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू असून मतदार मोठ्या संख्येन मतदानासाठी येत आहेत.
नंदुरबारमध्ये उन्हापासून बचावासाठी मतदान केंद्राबाहेर मंडपाची सोय, मतदारांचा चांगला प्रतिसाद - नंदुरबार
जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सावलीसाठी मंडपाची सोयदेखील केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दळणवळणाची मोठी समस्या आहे. यामुळे मतराची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. जिल्ह्यात उष्णतेचा पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. प्रशासनाने मतदारांसाठी मतदान केंद्रांवर सावलीसाठी मंडपाची सोयदेखील केली आहे. ग्रामीण भागातील जनताही मोठ्य़ा प्रमाणात रांगा लावून मतदानाला चांगला प्रतिसाद देत आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १८ लाख ७० हजार ११७ इतकी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल्कुवा, धडगाव, शहादा, नंदुरबार, नवापूर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर, अशा एकूण ६ विधानसभा मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. येथे प्रशासनाच्यावतीने एकूण १० हजार ४७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा आणि धडगाव या अतिदुर्गम भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा पुरेशी नसल्यामुळे संवाद यंत्रणा तयार करण्यात आली आहे.