नंदुरबार - जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आदिवासी बहुल भागात नागरिकांमध्ये मनोरंजनाची सर्वात लोकप्रिय लोककला म्हणून सोंगाड्यांची ओळख आहे. सोंगाड्याची हीच लोकप्रियता ध्यानाता घेत प्रशासनाने सोंगाड्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.
- आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणासाठी सोंगाड्यांकडून जनजागृती -
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये लसीकरणाबाबत विविध अफवांना ऊत आला होता. ते दूर करण्यासाठी आदिवासी बोलीभाषेतील गीतावर आदिवासी महिलांचा पेहराव करुन लोकमनोरंजन सादर करणारे हे पुरुष मंडळी आहेत. सोंगाड्या पार्टी लयबद्ध पद्धतीने नाच करतात. खास महिला आवाज काढून गाणं म्हणण्याची ही पद्धत आणि दोन गाण्यांच्यामध्ये स्थानिक आदिवासी बोली भाषेतून लोकांना हसतखेळत ठेवण्याचे काम सोंगाड्या करतात. त्यामुळे गेली अनेक दशक आदिवासी बांधवांच्या मनावर सोंगाड्या पार्टी अधिराज्य गाजवत आहे. कार्यक्रमात गर्दी खेचायची आणि रंग भरण्याची सोंगाड्या पार्टीची हीच कला पाहून सध्या शासनाने सोंगाड्यांच्या मदतीतून आदिवासी बहुल खेड्यापाड्यात कोरोणा लसीकरणाचे काम सुरू केले. या सोंगाड्या पार्टी रोज कुठल्यातरी गावात जातात तिथे तीन ते चार तास सोंगाड्यांचे काम करत कोरोना लसीकरणाची जनजागृती देखील करत आहेत.
- आदिवासी भागांमध्ये सोंगाड्या पार्टीने केले नागरिकांना आकर्षित