नंदुरबार - शहरासह तालुक्यात सायंकाळी अवकाळी पावसासह तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. हवामान खात्याच्या वतीने गेल्या दोन दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
हवामान खात्याचा इशारा -
जिल्ह्यात विजेचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. यात अवकाळी पावसा सह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला होता.
वातावरणात अचानक बदल -
दुपारच्या सुमारास मोठ्याप्रमाणावर उकाडा होत असताना सायंकाळी अचानक वातातावरन बदलले ढगाळ वातावरण झाले. व काही मिनिटातच अवकाळी पाऊस सुरू झाला. नंदुरबार शहरातील काही भागात पाऊस झाला तर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील उमर्दे व खोंडामळी परिसरात गारपीट झाली. तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. सुमारे २० मिनिटापर्यंत पाऊस झाला.
बळीराजा पुन्हा चिंतेत -
तीन महिन्यात जिल्ह्यात दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसात गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, लागवडीची सुरुवात असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण कमी होते. मात्र, आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणी वर आलेला गहू व हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.