नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करावा असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहे. मात्र, दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा व नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील तीनसमाळ, रोषमाळ ही आदिवासीबहुल दुर्गम गावं सातपुडा पर्वतरांगेत वसलेली आहेत. एकीकडे अथांग नर्मदा तर दुसरीकडे घनदाट जंगल. याठिकाणी ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य करण्यासाठी गावातील एका युवकाने विद्यार्थ्यांना चक्क झाडाच्या फांदीवर बसून सोशल डिस्टंन्सिंगसह शिक्षण देण्याचे ठरवले व त्यात तो यशस्वी झाला. त्याच्या या उपक्रमाने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहेत.
धडगाव तालुक्यातील तीनसमाळ, रोषमाळ ही आदिवासीबहुल दुर्गम गाव सातपुडा पर्वतरांगेत वसलेली आहेत. याठिकाणी ऑनलाइन शिक्षणाबाबत कुठल्याही पर्याय नसल्यामुळे गावातील लक्ष्मण पावरा याने ऑनलाइन शिक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. लक्ष्मण पावरा हा समाजशास्त्र विषयाचं शिक्षण घेत आहे. लॉकडाऊनमुळे तो गावाला परत आल्यामुळे गावातील मुलांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, गावातल्या मुलांना मोबाईलची रेंज ही मुख्य अडचण येत आहे. तर, ठराविकच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्यामुळे सर्वांना ऑनलाइन शिक्षण घेता येणे शक्य नव्हते. त्यावर लक्ष्मणने शक्कल लढवली आणि इंटरनेट कुठे मिळते याचा शोध घेतला. त्यानंतर, दररोज सकाळी तो घनदाट जंगलातून दीड ते दोन किलोमीटर चालत डोंगरावर मुलांना सोबत घेऊन जाऊ लागला. तिथं एका उंच झाडाच्या फांद्यांवर रेंज मिळविण्याचा प्रयत्न केला. रेंज मिळाल्यानंतर अभ्यास डाऊनलोड झाल्यानंतर लक्ष्मण विद्यार्थ्यांना सोप्या आपल्या मातृभाषेत त्यांना शिकवू लागला.