नंदुरबार : Uday Samant On Maratha Reservation :नंदुरबार येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. (Maratha Reservation Issue) यापुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारकडून काम सुरू असून समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले. मात्र, दुर्दैवाने सर्वोच्य न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही. ते का? कोणामुळे यावर मात्र, मंत्री सामंत यांनी बोलणे टाळले.
तरुणांनी टोकाची पावले उचलू नयेत :मराठा समाजातील तरुणांनी टोकाची पावले उचलू नयेत, असे आवाहन देखील मंत्री सामंत यांनी केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस राज्याचे अकार्यक्षम गृहमंत्री असल्याची टीका विरोधकांकडून होत असल्याने यावर वाजे प्रकरणाचा उल्लेख करत सडेतोड उत्तर देत सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच चुकीला माफी नाही. आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या :ललित पाटील प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जातात. मात्र, जोरात बोलून खोटं सत्यात बसवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहे त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत. तर विरोधकांकडे ललित पाटील प्रकरणाची मोठ्या प्रमाणात माहिती असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आरोप करणाऱ्यांनी याचेही उत्तर द्यावे की, सचिन वाजे हा कुणाचा होता आणि त्याच्या माध्यमातून वसुली फोन करत होते, असाही प्रश्न त्यावेळेस त्यांनी उपस्थित केला आहे.