नंदुरबार - भरधाव वेगातील पिकअप गाडीने समोरुन येणार्या प्रवासी वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबार ते धुळे रस्त्यावर काठोबा देवस्थानाजवळ घडली. या अपघातात दोन महिला जखमी झाल्या असून हा अपघात इतका भीषण होता की प्रवासी वाहन पूर्णतः चक्काचूर झाले आहे. तर पिकअप गाडीदेखील रस्त्यावर उलटल्याने नुकसान झाले आहे. जखमींना मिळेल त्या वाहनाने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिकअप वाहनचालकाविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार-धुळे रस्त्यावर भीषण अपघात; जागीच दोन ठार
नंदुरबार दोंडाईचा रस्त्यावरील रनाळे गावाजवळील काठोबा देवस्थानाजवळ अपघात झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात प्रवासी वाहन पूर्णतः चक्काचूर झाले असून पिकअप गाडीदेखील रस्त्यावर उलटल्याने नुकसान झाले आहे.
नवापूर तालुक्यातील नवापाडा येथील याकुब प्रताप गावीत हे (एम.एच.03 बी.जे.2975) या वाहनाने प्रवासी घेवुन दोंडाईचाकडून नंदुरबारला येत होते. यावेळी नंदुरबारहुन दोंडाईचाकडे जाणार्या भरधाव पिकअप गाडीने (क्र.एम.एच.39 सी.9362) समोरुन येणार्या प्रवासी वाहनाला धडक दिली. या दोन्ही वाहनांचा अपघात इतका भीषण होता की, समोरासमोर धडक झाल्याने वाहने रस्त्यावर उलटली. प्रवासी वाहनातील चालक याकुब प्रताप गावीत (वय 25, रा.नवापाडा) व सुलेमान गावीत हे दोघेही जागीच ठार झाले. तर सोनिया कमलाकर गावीत (वय 22, रा.खांदेपाडा ता.नंदुरबार), पल्लवी सुलेमान गावीत (वय 22) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मिळेल त्या वाहनाने जखमींना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 6.30 वाजता घडली. याबाबत सोनिया कमलाकर गावीत यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप गाडीचालक उमाकांत प्रभाकर मराठे (रा.महाराष्ट्र व्यायामशाळा, नंदुरबार) याच्याविरुध्द भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.टी.पवार करत आहेत.