नवापूर (नंदुरबार) - नवापूर शहरात पोलीसमद्याने भरलेल्या ट्रकचा पाठलाग करत होते. यावेळी चालकाने नारायणपूर रस्त्यामार्गे शास्त्रीनगर वसहतीकडून ट्रक पळवला. भरवस्तीतून ट्रक नेताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. यामुळे हा ट्रक जवळ असलेल्या नाल्यात उलटला. ही घटना सोमवारी (दि. 1 जून) रोजी घडली.
दारूचा ट्रक उलटल्याची बातमी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पण, पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी आणखी पोलिसांची कुमक बोलवून बंदोबस्त वाढवला. नाल्यात उलटलेल्या ट्रकमधील मद्यसाठा कोणाचा आहे, तो वैध की अवैध, हे मात्र गुलदस्त्यात आहे. रात्री उशिरापर्यंत नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
धुळे-सुरत महामार्गाने जाणार्या ट्रकमधून मद्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक नासिर पठाण यांच्यासह पथकाने ट्रकचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने महामार्गावरून ट्रक करंजी-ओवारामार्गे गावात आणला. नवापूर शहरातील भरवस्तीत असलेल्या नारायणपूर रोडने शास्त्रीनगर मार्गे चालक ट्रक घेवून जात होता. यावेळी नाल्यावरून ट्रक नेताना चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक (क्र. जी जे 18 एक्स 9790) नाल्याच्या कड्यावरून घसरून नाल्यात उलटला. भरवस्तीत हा अपघात झाल्याने मोठा आवाज परिसरात घुमला. या आवाजाने घरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दारूने भरलेल्या बाटल्यांचे खोके नागरिकांच्या नजरेस पडताच दारूचा ट्रक नाल्यात उलटल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली.
मद्याचा ट्रक उलटल्याची घटना ही नागरिकांसाठी कुतूहलाची असल्याने शहरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, पोलीस उपनिरीक्षक नासिर पठाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून बंदोबस्त ठेवला. ट्रक उलटल्याने चालक तेथून पसार झाला. पोलिसांनी काही लोकांच्या मदतीने दारूसाठा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याती प्रक्रिया सुरू होती. नाल्यात ट्रक उलटल्याने चालक पसार झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली.
हेही वाचा -नंदुरबारमध्ये कापूस लागवड सुरु; शेतकऱ्यांना प्रतीक्षा वरुणराजाची