नंदुरबार- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना दवाखान्याच्या बाहेर अथवा घरीच उपचार घ्यावा लागत होता. याकरिता जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने रेल्वे कोविड कोच नंदुरबारात पाचारण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसातच रेल्वेत लागणाऱ्या योग्य साधनसामग्रीसह सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानाची धकधक लक्षात घेता तापमान समतोल राहावे म्हणुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आली आहे. आज या कोचमध्ये पहिल्याच दिवशी 18 रुग्णांनी उपचार घ्यायला सुरवात केली आहे. सुमारे 400 पेक्षा अधिक रुग्ण या कोविड कोचमध्ये उपचार घेऊ शकतील अशी सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.
३१ कोविड कोचमध्ये उपचार सुरू
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण कमी असल्यामुळे प्रशासनाद्वारे परिस्थिती नियंत्रणात होती. परंतु कोरोनाच्या दुसर्या लाटेत नंदुरबार जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे मृत्यू दर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा वासियांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु त्यात देखील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी महाराष्ट्र शासनाकडे रेल्वे कोवीड कोच (आयसोलेशन वॉर्ड) ची मागणी केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नंदुरबार रेल्वे स्थानकात ३१ डब्यांची द्वितीय श्रेणीची रेल्वे गाडी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी पाठवली आहे.
पहिल्या दिवशी 18 रुग्ण दाखल
रेल्वे कोविड कोच सेंटरमध्ये रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी 18 रुग्ण दाखल झाले आहे. एकलव्य कोवीड सेंटरमधील कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना रेल्वे आयसोलेशन वार्ड मध्ये शिफ्ट करण्याचे काम देखील सुरू असल्याचे डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
जेवण, चहा, नाश्तासह मोफत उपचार.