नंदुरबार - नवापूर तालुक्यात 13 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, केळी ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या पुलावरून प्रवास करत मतदानाचा हक्क बजावावा लागत आहे. केळी ग्रामपंचायतीच्या मतदारांना अपेक्षा आहे ती गावाच्या विकासाची, म्हणून पाण्याच्या प्रवाहात प्रवास करून बजावीत आहेत आपला मतदानाचा हक्क.
धरणाच्या पाण्याचा ओवरफ्लो
पावसाळ्यात धरणाचे पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे कंबरेएवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी मोठ्या पुलाचे काम गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अर्धवट आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपेक्षा गावाच्या विकासाची
केवडीपाडा गावाला तीन किलोमीटर लांब मतदान केंद्रावर मतदानासाठी जावे लागत आहे. केवडीपाडा गावात मतदानकेंद्र निर्माण करण्याची मागणीदेखील नागरिकांनी केली आहे. नागन प्रकल्पामुळे पुनर्वसन-केवडीपाडा गावाला पुनर्वसनामुळे मोठा फटका बसला आहे. वीस वर्षांनंतरही अनेक नागरिकांना पुनर्वसनाचा मोबदला मिळालेला नाही. एकूणच केळी ग्रामपंचायतीमधील नागरिकांना बाजाराच्या ठिकाणी व शेतात जाताना नागन प्रकल्पाच्या पाण्याखाली आलेल्या या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावताना नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी केली आहे. जेणेकरून गावाच्या विकास होईल, अशी अपेक्षा केळी ग्रामपंचायतीच्या मतदारांनी व्यक्त केली आहे.