नंदुरबार - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोडीला सुरुवात झाली असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे वाहतूक शाखा आणि परिवहन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन जाणारे ट्रॅक्टर चालक देतायत अपघाताला निमंत्रण
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोडीला सुरुवात झाली आहे. या उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व वाहतुकीकडे वाहतूक विभाग अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. ऊस रमशेरपूर साखर करखान्यात ट्रॅक्टर ट्रालीच्या साहायने शेतकरी घेऊन जातात. मात्र, एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या लावून क्षमतेपेक्षा अधिक वजन ट्रॅक्टरमध्ये भरले जाते. यामुळे वाहतूक करत असताना ट्रॅक्टरची पुढची दोन्ही चाके हवेत उचलली जात असून ट्रॅक्टर फक्त दोन चाकांवर चालत असल्याने अपघाताची शक्यता आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे.
तालुक्यातील प्रकाशा परिसरात रस्त्याचे काम सुरू आहेत. त्यामुळे रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यातच याठिकाणी चढ उतार असल्याने ट्रॅक्टरला दोन किवा तीन ट्रॉली लावून वाहतूक होत आहे. यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने ट्रॅक्टरची पुढील दोन चाके हवेत उचलली जातात. त्यामुळे चालकाला मोठी कसरत करत ट्रॅक्टर चालवावा लागत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जीवघेण्या ऊस वाहतुकीकडे प्रशासन का दुर्लक्ष करत आहे, हा प्रश्न आहे.