नंदुरबार- राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळला ओळखले जाते. तोरणमाळला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस हेच मुख्य साधन आहे. मात्र एसटीची सेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने स्थानिकांची आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
तोरणमाळमध्ये गेल्या दीड महिन्यापासून आलीच नाही लालपरी - थंड हवेचे ठिकाण
तोरणमाळला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस हेच मुख्य साधन आहे. मात्र एसटीची सेवा गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने स्थानिकांची आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात तोरणमाळ आहे. तोरणमाळ गावासह परिसरातील 22 पाड्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागत आहे. बांधकाम विभाग आणि राज्य परिवहन विभागाच्या समन्वयाअभावी ही बससेवा बंद असल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहेत. तोरणमाळ या ठिकाणी जाण्यासाठी छत्तीस किलोमीटरचा घाट आहे. दोन ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तसेच काही ठिकाणी डोंगरावरील मोठे दगड खाली आले होते. बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करत रस्ता सुरू केला. मात्र काही ठिकाणी अजूनही मोठे दगड तसेच पडून आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना तोरणमाळला जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी करून रस्ता पूर्ववत सुरू करावा आणि परिसरात बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय येत्या आठ दिवसात उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.