महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ETV Bharat Special : टाकाऊ वस्तूंपासून युवकाने बनवली तीन चाकी इलेक्ट्रिक कार - बॉटरी वर चालणारी कार

सध्या इंधन दरवाढीचा सर्वत्र भडका सुरू आहे. अशातच नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील अर्जुन चौरे या २६ वर्षीय युवकाने भंगारातील टाकाऊ वस्तूंपासून तीन चाकी इलेक्ट्रिक कार बनविली आहे. ही कार ताशी ४५ किलोमीटर या वेगाने धावते. ही कार चालवायला खूप सोपी असून या कारच्या माध्यमातून ५० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी फक्त १ रुपया एवढाच खर्च येतो असे त्याने सांगितले आहे.

three-wheeled electric car made in nandurbar
टाकाऊ वस्तूंपासून युवकाने बनवली तीन चाकी इलेक्ट्रिकल कार

By

Published : Jul 11, 2021, 1:46 PM IST

Updated : Jul 11, 2021, 2:06 PM IST

नंदुरबार - तालुक्यातील अजेपूर येथील एका २६ वर्षीय युवकाने भंगारातील टाकाऊसाहित्य वापरुन तीन चाकी इलेक्ट्रिक कार बनविली आहे. लिथियम बॅटरीचा वापर करुन तयार केलेली ही कार ताशी ४५ किलोमीटर इतक्या वेगाने धावू शकते. या कारच्या माध्यमातून ५० किलोमीटर अंतर कापण्यासाठी केवळ 1 रुपया इतका खर्च येतो. सद्यस्थितीत वाढत चाललेल्या इंधन दरांमुळे जनसामान्य हैराण झाले आहेत. यामुळेच इंधन दरवाढीवर उपाय शोधण्यासाठी तीन चाकी इलेक्ट्रिक कार बनविल्याचे हा युवक सांगतो. पाहुयात याबाबतचा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट....

टाकाऊ वस्तूंपासून युवकाने बनवली तीन चाकी इलेक्ट्रिकल कार

अर्जुन हा पंपींग स्टेशनवर करतो काम -

नंदुरबार तालुक्यातील अजेपूर येथील अर्जुन चौरे असे ही कार तयार करणाऱ्या २६ वर्षीय युवकाचे नाव आहे. त्याचे शिक्षण नंदुरबार येथील शासकीय आयटीआय इलेक्ट्रिकल्समध्ये झाले आहे. सध्या तो नंदुरबार पालिकेंतर्गत झराळी येथील पंपींग स्टेशनवर खासगी विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. यातून त्याला मिळणारे मानधन तोकडेच आहे. घरी आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. अर्जुन चौरे याच्याकडे वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. मात्र यात उदरनिर्वाह चालविणे कठीण जाते. त्यातच आता दिवसेंदिवस वाढणार्‍या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाल्याचे चित्र दिसत आहे. याचे चटके अर्जुनला देखील सोसावे लागत आहे.

इंधन दरवाढीवर उपाय म्हणून बनविली इलेक्ट्रिक कार -

अजेपूरहून नंदुरबारला पाणी पुरवठा करणार्‍या झराळी प्रकल्पापर्यंत अर्जुन जुन्या दुचाकीने पोहचत होता. मात्र इंधन दरवाढीमुळे त्याला मिळणार्‍या मानधनात दुचाकी वापरणे कठीण होते. नंदुरबार जिल्ह्यात सध्या 107 रूपयांवर पेट्रालचे दर पोहोचले आहेत. यामुळे पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी काहीतरी नवीन शोधावे यासाठी विचार करत असतांना एक भन्नाट कल्पना त्याला सुचली. सध्या बाजारात बॅटरीवर चालणारी स्कुटी विक्रीला आहे. बॅटरीवर चालणार्‍या कारचे प्रयोग देखील होत आहेत. असे असले तरी भंगारातून विविध साहित्य गोळा करुन लिथियम बॅटरीचा वापर करीत तयार केलेली तीन चाकी कार सध्या परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे.

भंगारापासून १५ दिवसांत बनविली कार -

अर्जुन झराळी येथील पंपींग स्टेशनवर कार्यरत असल्याने त्याला वीजेची उर्जा प्रवाहित होवून कोठे आणि कसा परिणाम घडविते याचा अभ्यास होता. याचाचा उपयोग करीत इलेक्ट्रिक कार तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला. यासाठी भंगारातील टाकाऊ चाक, टायर, स्टेअरिंग त्याने मिळविले. याचा जुगाड करीत एक चालक व मागे एक जण बसू शकेल अशा आसन व्यवस्थेलाच खालून रॉडचा आधार देत तीन चाकी कार त्याने बनवली आहे. यात लिथियम बॅटरीचा वापर त्याने केला आहे. ही कार तासभर चार्जिंग केल्यावर ४५ ते ५० किलोमीटर अंतर ताशी ४५ किलोमीटर वेगाने कापू शकते. यासाठी त्याला ४० हजारांचा खर्च आला. अवघ्या १५ दिवसांत त्याने ही तीन चाकी कार तयार केली.

सोलर कार बनविण्याचा अर्जुनचा मानस -

इलेक्ट्रिक तीन चाकी कार बनविल्यानंतर अर्जुनचे मनोधैर्य वाढले आहे. लवकरच कमी खर्चात इंधनाचा वापर न करता वीजेवर तसेच सोलरवर चालणारी कार तयार करण्याचा अर्जुनचा मानस आहे. ही कार चालवताना कुठलाही आवाज येत नाही व ध्वनी प्रदुषणही होत नाही. या आगळ्या वेगळ्या कारची सर्वंत्र चर्चा होत आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये दोन दुचाकींचा भीषण अपघात; पाच जण ठार

Last Updated : Jul 11, 2021, 2:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details