नंदुरबार -तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी मोबाइलचे दुकान फोडून चोरी केली होती. या गुन्ह्याची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत 2 लाख 89 हजार किंमतीचे 65 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
नंदुरबार शहरातील बस स्थानकासमोरील सत्कार मोबाइल रिपेअरींग दुकानात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान 16 हजारांच्या रोकडसह रिपेरींगसाठी आलेल्या मोबाइलची चोरी झाली होती. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपासाची चक्रे फिरवत दोन स्वतंत्र पथके तयार केली. या पथकाला शहरातील खबरींकडून मिळणार्या माहितीच्या आधारे मागोवा घेण्याच्या सूचना दिल्या. बसस्थानकासमोरील मोबाइल दुकानातील चोरी ही सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट भिलाटी व चिंचपाडा भिलाटी येथील अल्पवयीन 5 ते 6 मुलांनी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने गिरीविहार गेट भिलाटी, जोगनी माता मंदिर, चाररस्ता परिसरातून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.