नंदुरबार - शहादा तालुक्यातील विद्यमान 19 सरपंच व 3 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. शहादा नगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पक्षाला भक्कम बनविण्यासाठी उचललेले हे पाऊल पक्ष बांधणीसाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पक्षबांधणी -
जिल्ह्यात येत्या सहा महिन्याच्या कालावधीत होऊ घातलेली जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक तसेच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. राजकीय वर्तुळात पक्ष बदलीचे राजकारण सुरू झाले असून राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाध्यक्ष मोहन शेवाळे व शांतीलाल साडी यांनी ग्रामपंचायतीचे विद्यमान 19 सरपंच व शहादा नगरपालिकेचे 3 नगरसेवकांना एकत्रित करत राष्ट्रवादी पक्षाला बळकटी करण्याचा मार्ग सुकर केला आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले. शहादा येथील भाजपा, काँग्रेस व एमआय एम पक्षाच्या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाकडे मातब्बर नेते असतांनासुद्धा हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षामध्ये देखील खिंडार पडले आहे. शहरातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचेदेखील पक्षाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी राष्ट्रवादी पार्टीला युवा नेतृत्व मिळाल्यामुळे पुन्हा जोमाने काम करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना मिळाली आहे.