नंदुरबार -देशातील सर्वात मोठे लाल मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या बाजार समितीत आत्तापर्यंत ३० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी करण्यात आली आहे. तर, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात सुरू होणारा लाल मिरचीचा हंगाम यावर्षी खराब हवामानामुळे २ महिने उशिरा सुरू झाला आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या ३ वर्षांपासून दीड लाख क्विंटलच्यावर मिरचीची आवक होत आहे. साधारणत: सप्टेंबर महिन्यापासून मिरची हंगामाला सुरुवात होते. तर, मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत लाल मिरची खरेदी-विक्री होत असते. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे मिरची हंगामाला एक महिना उशीर झाला आहे. तरीही आतापर्यंत ३० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सांगण्यात आले. मात्र, उत्पन्नात वाढ होऊ शकते असा देखील अंदाज त्यांनी वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदाचे भाव वाढतील किंवा कमी होतील अशी शक्यता देखील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.