नंदुरबार- कोरोना रोखण्यासाठी रविवारी नंदुरबारमध्ये कडक संचारबंदीचे पालन करण्यात आले. मात्र, दिवसभरात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. नंदुरबार शहरात तब्बल 10 तर शहाद्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
नंदुरबारातील एकाचा अहवाल मृत्यूच्या दोन दिवसानंतर पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 260 वर पोहोचला आहे. तसेच तीन जण संसर्गमुक्त झाल्याने 151 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार शहर व तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबार शहरात प्रत्येक रविवारी कडक संचारबंदी जारी केली आहे.
रविवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये नंदुरबारमध्ये 10 जणांना तर शहाद्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात 36 वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागातील 70 वर्षीय वृध्द महिला, 45 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय युवक व एकता नगरातील 42 वर्षीय महिला, रायसिंगपुरा भागात 22 वर्षीय युवक, चौधरी गल्लीत 85 वर्षीय वृध्द, आंबेडकर चौकातील 75 वर्षीय मयत पुरुष व नंदुरबारात एका 36 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.