नंदुरबार- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दररोज बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 366 झाली असून आता जिल्हातील कोरोनाबाधितांची संख्या 400 च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 20 झाली आहे.
कोरोनाच्या संकटाचा सामना आणि विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. आरोग्य विभागासह प्रशासनातील सर्वच यंत्रणा कोरोनायोध्दा म्हणून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नंदुरबार व शहादा शहरात प्रत्येक रविवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, दिवसेंदिवस येणार्या अहवालात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढू लागली आहे.
रविवारी कोरोनाचे 10 रुग्ण वाढले आहेत. यातील नवापूर येथील नारायणपूर रोड परिसरातील 72 वर्षीय वृध्दाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या वृध्दाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु त्याचा प्रतीक्षेत असलेला अहवाल पॉझिटिव्ह आला.
नंदुरबार शहरातील मच्छीबाजारात 28 वर्षीय युवक, गांधी नगरातील 42 वर्षीय पुरुष व 21 वर्षीय युवती, चौधरी गल्लीत 80 वर्षीय वृध्द व 55 वर्षीय महिला, ज्ञानदीप सोसायटीत 44 वर्षीय पुरुष तसेच शहादा येथील संभाजी नगरात 54 वर्षीय महिला, नवापूर येथील जुनी महादेव गल्लीत 54 वर्षीय पुरुष, नवापूर तालुक्यातील प्रतापपुर येथे 72 वर्षीय पुरुष अशा दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने बाधित राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे.
नवापूर येथील नारायणपूर रोडवरील 72 वर्षीय वृध्दाच्या मृत्यूनंतर दुसर्या दिवशी अहवाल आला आहे. मुंबई येथे उपचारासाठी गेलेला शहाद्यातील 72 वर्षीय रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी शनिवारी दाखल केले होते. त्यांचा रविवारी मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 20 झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 366 झाली असून 213 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 121 जण उपचार घेत आहेत.