नंदुरबार -शेतकऱ्यांना १२ अखंडित वीजपुरवठा मिळावा, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिली जाते, अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ( Swabhimani Agitation In Nandurbar ) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर 'रास्ता रोको' ( Nandurbar Rasta Roko Agitation ) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
विविध मागण्यांसाठी शेतकर्यांचे 'रास्ता रोको' आंदोलन -
विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभार आणि शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शहादा शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रस्ता रोको आंदोलनामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.