नंदुरबारमध्ये वादळी पावसामुळं कोट्यवधींची मिरची पाण्यात नंदुरबार Unseasonal Rain In Nandurbar : रविवारी (26 नोव्हेंबर) नंदुरबारसह राज्यातीन अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली असून शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच शहादा तालुक्यातील जावदा येथे शेतात काम करणार्या 17 वर्षीय मुलीच्या अंगावर वीज पडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय.
वीज कोसळून तरुणीचा मृत्यू : शहादा तालुक्यातील जावदा येथील सपना राजेंद्र ठाकरे (वय 17) ही युवती कापूस वेचणीसाठी शेतात गेली होती. यावेळी शेतात काम करत असताना वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं शेतानजीक असलेल्या झाडाजवळ जावून ती थांबली असता वीज अंगावर येवून कोसळल्यानं युवतीचा मृत्यू झाला. दरम्यान, शहादा शहरासह तालुक्यातही मुसळधार अवकाळी पाऊस बरसला असून या पावसानं शेती पिकाचं अतोनात नुकसान केलंय. केळीच्या बागांसह मिरची, कापूस आदी पीकं धोक्यात आली असून नुकसानीच्या संकटानं शेतकरी चिंतेत सापडला आहे. शहादा शहरासह परिसरात झालेल्या पावसामुळं सर्वत्र पाणी साचल्याचं दिसून आलं.
कोट्यवधींचं नुकसान :नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असताना याचा फटका नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिरची व्यापाऱ्यांना बसलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली मिरची वाळवण्यासाठी पथाऱ्यांवर टाकली होती. मात्र, अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानं जवळपास 25 ते 30 हजार क्विंटल मिरची खराब होण्याची शक्यता आहे. पावसात भिजलेली 30% मिरची खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांना जवळपास अडीच ते तीन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, पावसात ओली झालेली मिरची काळी पडत असल्यानं बाजारभाव कमी होत असल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे.
हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट :हवामान खात्यानं नंदुरबार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच पुढील 3 दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
हेही वाचा -
- अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं 'दिवाळं'; हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, पाहा व्हिडिओ
- साताऱ्याला अवकाळी पावसाने झोडपलं, राजवाडा चौपाटी जलमय; पाहा व्हिडिओ
- मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस