नंदुरबार -अक्कलकुवा येथे आक्षेपार्ह स्टेटसच्या वादातून मध्यरात्री जमावाकडून तुफान दगडफेक ( Stone Throwing Akkalkuwa ) करण्यात आल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान करुन तोडफोड करण्यात आले. दरम्यान घटनेचे माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 48 संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहीती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे. दरम्यान विशेष महा पोलीस निरीक्षक डी.जे. शेखर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. गाव पूर्णतः अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दगडफेक व वाहनांची तोडफोड :आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर घरी परतत असतांना त्या गटातील काही समाजकंटकांनी अक्कलकुव्यातील तळोदा नाका, मुख्य बाजारपेठ, झेंडा चौक, शिक्षक कॉलनी या भागातून जातांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड सुरु केली. तसेच घरांवर दगडफेक करत लाठ्या-काठ्या, पाईप घेवून वाहनांची तोडफोड करत नुकसान करण्यात आहे. परिसरात काचेच्या बाटल्या व दगड, विटांचा खच पडलेला होता. यामुळे अक्कलकुव्यातील काही भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी पोलीस दाखल :अक्कलकुवा पोलिसांनी वेळीच धाव घेत जमावाला पांगवत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील हे आपल्या ताफ्यासह तत्काळ अक्कलकुव्यात दाखल झाले. त्याचबरोबर धडगाव, विसरवाडी, मोलगी, सारंगखेडा, नंदुरबार येथून अतिरिक्त बंदोबस्त मागवून संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे घाबरलेल्या नागरीकांना दिलासा देवून याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपींना तत्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. संवेदनशील भागात कडेकोट पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने तणावपूर्ण शांतता आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार केले असून कार्यवाहीसाठी रवाना केले आहे. अक्कलकुवा पोलिसांनी तालुक्यातील परिसर पिंजुन काढत 24 संशयित आरोपींना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
शिवसेना संपर्क कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड :आक्षेपार्ह पोस्टवरुन जमावाने दगडफेक करत अक्कलकुवा शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचे फोडण्यात आली. कार्यालयातील वातानुकूलित यंत्रही दगडफेक करुन नुकसान करण्यात आले आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख रावेंद्रसिंह चंदेल यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.