नंदुरबार - तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात शेतातील पपई झाडांच्या कत्तलीचा प्रकार सुरु आहे. बोरद शिवारात पुन्हा एका शेतातील तब्बल 1500 ते 2000 पपईची झाडे अज्ञात माथेफिरुने तोडून फेकून दिल्याने शेतकर्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील आठवड्यापूर्वी देखील याच शेतात पपईची झाडे अज्ञाताने तोडून फेकली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने शेतकर्यांकडून संताप व्यक्त होत असून अज्ञात माथेफिरुचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.
माथेफिरुंकडुन बोरद शिवारात पपईच्या झाडांची कत्तल माथेफिरुंकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
बोरद येथील शेतकरी दत्तू रोहिदास पाटील यांच्या बोरद शिवारातील गट क्रमांक 214 मधील शेतातील उभ्या असलेल्या पपई पिकाची धारदार शस्त्राच्या सहाय्याने अज्ञात माथेफिरुने तब्बल 1500 ते 2000 झाडे कापुन नुकसान केले. मागील आठवड्यात सुध्दा 20 ते 30 पपईच्रा झाडांची कत्तल याच शेतात झाली होती. बोरद येथील जयसिंग चिंधा ठाकरे व बालम तुकड्या पवार यांच्या करणखेडा रस्त्याला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाची देखील नासधूस करून 40 ते 50 झाडांची कत्तल झाली होती. या घटना अजून सुरु असल्याने शेतकर्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पपईच्या पिकाला अर्ध्या पासून मोडल्याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घासावर घाला
सहा ते सात महिन्यांच्या पपईच्या पिकाच्या झाडांची कत्तल झाल्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास माथेफिरूच्या प्रकारामुळे हिरावला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी पथकासह दाखल होत पपई झाडांच्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केदार, पोकॉ.निलेश खोंडे, छोटू कोळी, रामोळे, सचिन अहिरे व शेतकरी उपस्थित होते. सदरील शेत मोड येथील शेतकरी रमाकांत सुदाम पाटील हे करीत असून एप्रिल महिन्यांत पपई पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या पपईला बऱ्यापैकी फळ व फुल्लर आल्याने चांगल्या प्रकारे उत्पन्न निघाले असते. परंतु माथेफिरुने केलेल्या कृत्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.
मागील पंधरा दिवसांपुर्वी देखील मोड येथील भगवान लोहार यांच्या कळमसरे शिवारात सुध्दा घडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. मागील आठवड्यात दत्तू रोहिदास पाटील यांच्या शेतातील पपईचे झाडे कापली होती. परंतु अद्यापपर्यंत माथेफिरूचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवुन पिकांची झाडे तोडून नुकसान करणार्या माथेफिरुचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.